महिला संवाद विशेष

वड अजूनही उभा आहे… पण सावित्री हरवली आहे

वटसावित्रीच्या निमित्ताने बदलत्या नात्यांचा वेध

ज्येष्ठ अमावस्येची सकाळ…

गावातल्या वडाच्या झाडाखाली रंगीबेरंगी साड्यां साज शृंगार करून हातात पूजेचं ताट, कपाळावर कुंकू, ओठांवर प्रार्थना माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो..

वडाभोवती धागे गुंडाळले जातात…

पण मनात एक प्रश्न मात्र सुटत नाही

धागे अजूनही वडाला गुंडाळले जातात… मग नाती का सुटत चालली आहेत…

आपण सावित्रीची कथा जपली; पण सावित्रीचा विचार हरवला.

आपण व्रत जपलं; पण व्रतामागची वृत्ती गमावली.

आपण पूजा ठेवली; पण नात्यांची पवित्रता विसरलो.

पुराणातली सावित्री यमाच्या मागे चालत गेली होती. मृत्यूशी झुंज देण्यासाठी.

आज काही घरांमध्ये मृत्यू बाहेरून येत नाही…
तो घरातच वाढवला जातो…

वर्तमानपत्र उघडलं की नात्यांच्या चितेचा धूर डोळ्यात शिरतो. कधी पत्नी पतीच्या हत्येच्या कटात अडकलेली दिसते, तर कधी पती पत्नीचा जीव घेतो. कुठे संशय रक्त सांडतो, कुठे स्वार्थ माणुसकीला गाडतो, तर कुठे विवाहबाह्य संबंध विश्वासाची हत्या करतात
नुकत्याच घडलेल्या घटना आठवल्या की मन सुन्न होत
एक सावित्री जी सत्यवानाच्या प्राणासाठी यमाला टक्कर देते
आणि आजची सावित्री पतीचा काटा काढण्यासाठी छळ करते

ही केवळ गुन्हेगारीची बातमी नसते…

ती आपल्या संस्कृतीच्या कपाळावर उमटलेली सुरकुती आहे..

वटसावित्रीच्या दिवशी आपण सावित्रीचा जयघोष करतो
पण दुसऱ्याच दिवशी न्यायालयात नात्यांचा खटला सुरू असतो.

हे नेमकं कुठे चुकलं वड बदलला नाही…

परंपरा बदलली नाही
बदलला तो माणूस…

एकेकाळी संसार प्रेमावर उभा होता. आता तो अपेक्षांवर उभा आहे. पूर्वी नात्यांत समर्पण होतं; आज व्यवहार आहे. पूर्वी मतभेद असले तरी संवाद होता; आता अहंकार आहे. मोबाईलच्या पडद्याने घरातली माणसं जवळ आणली नाहीत; उलट मनांच्या दरम्यान काच उभी केली.

आज प्रत्येकाला प्रेम हवं आहे…

पण त्याग नको.
साथ हवी आहे…पण जबाबदारी नको.
स्वातंत्र्य हवं आहे…पण संयम नको.

आणि या नको च्या गर्दीत आपण हरवत चाललो आहे.

सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी वाद घातला.

आज अनेक नाती अशी आहेत की माणसं एकमेकांशी बोलतही नाहीत.

यमाशी लढण्याचं धैर्य दूरच राहिलं; आपण स्वतःच्या अहंकाराशीही लढू शकत नाही.

समाजाने एक मोठी चूक केली आहे.

आपण वटसावित्रीला फक्त स्त्रीचं व्रत बनवलं.
खरं तर हे स्त्रीचं नव्हे, नात्याचं व्रत आहे…

आज जर सावित्रीची गरज असेल, तर तितक्याच सत्यवानाचीही गरज आहे.

पत्नीने पतीला देव मानावं, ही अपेक्षा आपण ठेवली पण पतीने पत्नीला माणूस समजावं हे शिकवायला विसरलो.

जिथे आदर नसतोतिथे प्रेम मरतं.

जिथे प्रेम मरतं, तिथे संशय जन्मतो.

आणि संशयाचं शेवटचं नाव अनेकदा गुन्हा असतं…

म्हणून आज वटसावित्रीकडे नव्याने पाहण्याची वेळ आली आहे.

वडाभोवती धागे गुंडाळण्यापूर्वी मनाभोवती विश्वास गुंडाळण्याची गरज आहे.

उपवास करण्यापूर्वी अहंकाराचा त्याग करण्याची गरज आहे.

सात जन्मांची शपथ घेण्यापूर्वी हा एक जन्म प्रामाणिकपणे जगण्याची गरज आहे.

कारण…
सावित्रीचा पराभव यमाकडून झाला नव्हता.

आज तिचा पराभव आपल्या बदललेल्या माणसाकडून होत आहे.

वड आजही तितकाच भक्कम उभा आहे.

प्रश्न वडाचा नाही…

प्रश्न त्याच्या सावलीत उभ्या असलेल्या माणसाचा आहे.

जर नाती जिवंत राहिली, तर प्रत्येक दिवस वटसावित्री आहे.

आणि जर विश्वासच मेला…

तर वडाभोवती हजार धागे गुंडाळले, तरी नातं वाचत नाही.

वडाची पूजा करून आयुष्य वाढत नाही; पण विश्वासाने नातं नक्कीच जगतं.

आज वड तितकाच भक्कम उभा आहे. बदलला आहे तो त्याच्या सावलीत उभा असलेला माणूस.
म्हणून यंदा वट सावित्रीच्या दिवशी वडाभोवती धागा गुंडाळताना एक क्षण स्वतःलाच एक प्रश्न विचारा…
आपण खरंच नातं जगतो आहोत, की फक्त त्याचा देखावा सांभाळतो आहोत

सावित्रीने सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणलं, असं पुराण सांगतं.
पण आज…
आपल्या घरातील सत्यवान आणि सावित्री जिवंत असूनही त्यांच्या नात्यांचा मृत्यू का होत आहे..

वड अजूनही उभा आहे.
धागे अजूनही गुंडाळले जात आहेत.
उपवास अजूनही केले जात आहेत.
पण…
विश्वास अजूनही जिवंत आहे का
संवाद अजूनही शिल्लक आहे का
निष्ठा अजूनही श्वास घेत आहे का
की आपण वडाची पूजा करताना…
नात्यांच्याच अंत्ययात्रेला खांदा देत आहोत..

या प्रश्नाचं उत्तर धर्मग्रंथ देणार नाहीत…
विज्ञान देणार नाही…
समाजही देणार नाही…
उत्तर द्यावं लागेल प्रत्येकाला
स्वतःच्या मनासमोर… आणि स्वतःच्या नात्यासमोर…

संपादक
ज्योती आडेकर

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

No Content Available