
पंढरपूर, दि. 23 : आषाढी वारीसाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून, यंदा गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. नवमीच्या दिवशीच श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठीची रांग मंदिरापासून तब्बल आठ किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची दर्शनरांग जवळपास तिपटीने लांब असल्याने प्रशासनासमोर मोठे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.वारकऱ्यांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून प्रशासनाने उभारलेले २० हून अधिक विशाल दर्शन मंडप भरून गेले असून, तरीही दर्शनरांग आठ किलोमीटरपर्यंत वाढली आहे. भाविकांची संख्या सतत वाढत असल्याने आणखी व्यवस्था उभारण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संपूर्ण पालखी मार्गावर उभारण्यात आलेले विशाल जर्मन हँगर मंडप वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. या मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रांमध्ये वारकऱ्यांना विश्रांतीसह स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, पायांच्या मसाजची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच रात्री भजन-कीर्तनासाठी स्वतंत्र स्टेज आणि आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.








