बातम्याराजकीय

खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड


मुंबई :
 राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) 6 खासदारांना आपल्या गळ्याला लावत एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी केले आहे. त्यानंतर, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 मतदारसंघाचा दौरा करत, आता ऑपरेशन तुडवा सुरू करा असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुटीर खासदारांच्या मतदारसंघात काही ठिकाणी शिवसैनिक आक्रमक होताना दिसत असून आज नांदेडमध्ये (Nanded) ठाकरेंच्या शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) ताफ्याला काळे झेंडे दाखवत आपला विरोध दर्शवला. तर, सोशल मीडियातून देखील फुटीर खासदारांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला आज काळे झेंडे दाखवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सारखनी या गावाकडे जाताना ही घटना घडली. सारखनी हे गाव हिंगोली लोकसभा क्षेत्रात येते. इथले खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांना काही ठिकाणी विरोध होतोय. आज श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार आष्टीकर हे देखील या ताफ्यातून प्रवास करत होते. तेव्हा, हा ताफा जात सारखनी गावातून जात असताना शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी हाती बोर्ड, भगवे झेंडे आणि काळे झेंडे घेऊन खासदार आष्टीकरांसह श्रीकांत शिंदेंना आपला विरोध दर्शवला. 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी यवतमाळच्या उमरखेड येथील सवांद मेळाव्यात थेट शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करणे, प्रत्येक घरापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविणे, नवीन शिवसैनिकांची नोंदणी, बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्यात आले. या मेळाव्यात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पिक विमा संदर्भात प्रश्न मार्गी लावू असे यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले. आपल्या संवाद मेळाव्यासाठी जात असतानाच नांदेडमध्ये श्रीकांत शिंदे याच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts