Uncategorized

आषाढी एकादशीला धनगर समाजाचा आंदोलनाचा इशारा

पंढरपूर, दि 15 : प्रलंबित मागण्यासाठी धनगर समाजाकडून आषाढी एकादशी दिवशी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.एकादशीच्या दिवशी नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर शेळ्या-मेंढ्यांसह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला प्रतीकात्मक प्रदक्षिणा घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे.

पंढरपूर येथील रेस्ट हाऊस मधील समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.त्यात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली.मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.धनगर समाजाने अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारकाचा समावेश, अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटविणे, भवनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर करणे तसेच समाजातील सुशिक्षित युवकांना राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

धनगर समाजाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असतानाही संबंधित जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts