संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सदिच्छा भेट

पुणे, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आषाढी वारीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला आज इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छा भेट दिली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान त्यांनी डिजिटल चित्ररथातील विविध आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली.यावेळी शेलार आणि श्री.भरणे यांनी राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल सादरीकरणाची पाहणी केली. तसेच चित्ररथामध्ये उपलब्ध असलेल्या एआय आधारित चॅटबॉट प्रश्नमंजूषेचा अनुभव घेत शासनाच्या विविध योजनांबाबत प्रश्न विचारले.

वारकऱ्यांना सोप्या आणि आकर्षक पद्धतीने माहिती देणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पारंपरिक वारीसोबत आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

‘संवाद वारी’ ही नागरिकांशी प्रभावी संवाद साधणारी संकल्पना असून, डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या योजना अधिक सुलभ, आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version