जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

कोल्हापूर, दि. 17 : कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राधानगरी-भुदरगड-
आजरा विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या या बैठकीत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी, राधानगरी डॉ. शेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होवून नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक असून आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे श्री. पिंपळे यांनी नमूद केले.

बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर, राधानगरी भुदरगड आजरा पंचायत समिती सभापती सर्व, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच तहसीलदार,गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि इतर आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, 108 रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आपला दवाखाना तसेच इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती गावा-गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करावे.

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील आरोग्यविषयक प्रश्न प्रभावीपणे मांडून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच इतर आरोग्य विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विनाअडथळा उपचाराचा लाभ मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करून नागरिकांच्या तक्रारींना वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार, रुग्णांशी सुसंवाद आणि पारदर्शक सेवा यावर विशेष भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध आरोग्यविषयक समस्या, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा सविस्तर अनुपालन अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

0000

बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बारामती, दि. १७ : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी बारामती रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचे सांगितले.

यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव,उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा आधुनिकतेकडे वेगाने प्रवास सुरू असून जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही सेवा यामुळे भारतीय रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनली आहे. अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारतसारखे उपक्रम हे त्या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, विकासाची जाणीव आणि सर्जनशीलता वाढावी या उद्देशाने निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. “विकसित रेल्वे स्थानकाचा भारत” आणि “विकसित भारत घडवण्यासाठी मी काय करेन” या विषयांवर झालेल्या स्पर्धांमध्ये एम.ई.एस. गजाननराव भीमराव देशपांडे विद्यालय, निर्मला हरिभाऊ प्राथमिक शाळा तसेच इतर शाळांतील एकूण २ हजार ८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छ, आधुनिक, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक रेल्वे स्थानकाची संकल्पना मांडत विकसित भारतासाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

देशातील आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित होत आहेत, ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मोठी गती मिळाली असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचाच एक महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरेल. औद्योगिक क्षेत्राला वाहतूक सुविधा, कृषी उत्पादनांना बाजारपेठ, तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे साडे २६ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला असून त्यासाठी राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानकाच्या इमारतीमध्ये आधुनिक सुविधांसह स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब दिसेल अशी वास्तुरचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेलाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान स्मरणात ठेवून विकासाचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळत असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचेच उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या.

रेल्वे मंत्रालय, रेल्वे विकास निगम लिमिटेड, रेल्वे प्रशासन तसेच या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांनी बारामतीकरांना या आधुनिक रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि सौंदर्य जपण्याचे आवाहन केले. या पुनर्विकासामुळे बारामतीच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी प्रास्ताविकात पुणे विभागातील रेल्वे स्टेशन्सचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास याचा आढावा सांगून बारामती रेल्वेचा इतिहास विशद केला आणि बारामती रेल्वे परिसरातील लोकांना उत्तम सेवा देईल असे सांगितले.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पुणे विभागीय रेल्वे मंडळाकडून बारामती येथील शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील यशस्वी विध्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण
देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले. त्यानंतर बारामती येथील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पुनर्विकसित रेल्वे स्थानकाची पाहणी केली. तसेच स्थानकावर थांबलेल्या रेल्वेत जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेतले.

Exit mobile version