
पुणे: पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, MH-12 या वाहन नोंदणी मालिकेतील दोन अक्षरी क्रमांकांची मर्यादा आता जवळपास संपुष्टात आली आहे. शहरातील वाहनांची संख्या ४४ लाखांच्या पुढे गेल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता तीन अक्षरी (AAA ते ZZZ) नवीन नोंदणी मालिका सुरू करण्याच्या तयारीत आहे.या बदलासाठी पुणे आरटीओने राष्ट्रीय माहिती केंद्राकडे (NIC) नव्या क्रमांक रचनेसाठी मंजुरी मागितली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर नव्या वाहनांना MH-12 AAA 0001 अशा स्वरूपातील नोंदणी क्रमांक देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, हा बदल फक्त नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठीच लागू होणार आहे. सध्या रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या MH-12 क्रमांकात कोणताही बदल केला जाणार नाही. त्यामुळे जुन्या वाहनधारकांना नवीन नंबर घेण्याची आवश्यकता नाही.देशातील मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीपासूनच तीन अक्षरी नोंदणी मालिका वापरली जात आहे. आता वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातही त्याच धर्तीवर ही नवी प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे.आरटीओकडून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या नव्या नोंदणी मालिकेबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या बदलामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहन नोंदणीसाठी पुरेशी क्रमांक क्षमता उपलब्ध होणार असून, वाहन नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.