राजकीय
राजकीय

आरोप करायला फार अक्कल लागत नाही ; जरांगे पाटलांच्या टिकेला प्रवीण दरेकरांकडून उत्तर

जालना, दि. 6 : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. या टिकेला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उत्तर देत थेट मनोज जरांगे यांची अक्कलच काढली आहे.रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीममध्ये राहून काम करणं, यात खूप फरक असतो, असा टोला प्रवीण दरेकर यांनी जरांगे यांना लगावला.

एखाद्यावर आरोप करायला फार अक्कल लागत नाही. ज्यांना सिस्टीम समजून घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? जात पडताळणी समितीला न्यायालयीन अधिकार आहेत. कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही, लेखी देण्याचा तर विषयच नाही. काही त्रुटी असतील म्हणून नोंदी रद्द केल्या असतील. झोपलेल्याला जागं करता येते. मात्र झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

तसेच, मनोज जरांगे पाटील हे सतत अल्टिमेटम देत असतात. महाराष्ट्र हे सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारं राज्य आहे. माणसं तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम करावे. मराठा-ओबीसी वाद लावणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

आरोप करायला फार अक्कल लागत नाही. कुठल्या मंत्र्याने त्रास दिला, नाव सांगावं. आम्ही मराठा समाजाचे, पण आम्हाला कोणता मंत्री त्रास देत नाही. मुख्यमंत्री आम्हाला ताकद देतात. बावनकुळे हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यांची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही, असेही दरेकर यांनी म्हटले.

मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे संतापलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts