
पुणे, दि. 4 : घरगुती एलपीजी वापरकर्त्यांसाठी आता पारंपरिक लोखंडी सिलेंडरला पर्याय म्हणून स्मार्ट गॅस सिलेंडर (कंपोजिट सिलेंडर) उपलब्ध झाला आहे. वजनाने हलका, पारदर्शक आणि अधिक सुरक्षित मानला जाणारा हा आधुनिक एलपीजी सिलेंडर ग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे, सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे बाहेरूनच सहज दिसत असल्याने गॅस अचानक संपण्याची चिंता कमी होते.
इंडियन ऑइल आणि बीपीसीएलसारख्या तेल कंपन्यांकडून १० किलो आणि ५ किलो क्षमतेचे कंपोजिट सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. या सिलेंडरसाठी अंदाजे ₹३,००० ते ₹३,३५० इतकी सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) भरावी लागते.
स्मार्ट गॅस सिलेंडरची प्रमुख वैशिष्ट्येपारदर्शक बॉडी: सिलेंडरमधील गॅसची पातळी बाहेरून स्पष्ट दिसते. त्यामुळे गॅस संपण्यापूर्वीच रिफिल बुक करणे शक्य होते.
हलके वजन: पारंपरिक लोखंडी सिलेंडरच्या तुलनेत हे सिलेंडर जवळपास ५० टक्के हलके असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही ते सहज हाताळता येते.
गंजरोधक रचना: फायबर ग्लास आणि पॉलिमरपासून बनविल्यामुळे सिलेंडरला गंज लागत नाही तसेच जमिनीवर गंजाचे डागही पडत नाहीत.
अधिक सुरक्षित: उच्च दाब सहन करण्याची क्षमता असल्याने स्फोटाचा धोका तुलनेने कमी मानला जातो.तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल ठरणारा हा स्मार्ट कंपोजिट सिलेंडर भविष्यात घरगुती एलपीजी वापरात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.