पुणे

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे, दि.24 : पवना धरण 95 टक्के भरल्याने आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज (24 जुलै) सकाळी 9 वाजल्यापासून पवना नदीपात्रात विद्युतगृहाद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण प्रकल्प प्रशासनाने दिली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारा पाण्याचा येवा लक्षात घेऊन हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 5,000 क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. विसर्ग वाढविण्यापूर्वी संबंधित माहिती वेळेत देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.सततच्या पावसामुळे पवना नदी, ओढे आणि नाल्यांतील पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts