
पुणे, दि. 31 : जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांनी एक प्रतिक्रिया दिली. त्यावर आता टिकेची झोड उठली आहे.महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. लिंगपिसाट अशोक खरातचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची खोचक टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
धंगेकर म्हणाले हे कोल्हापुरचं पार्सल आहे. पुढच्या वेळेस पुण्यात राहील की नाही माहिती नाही. पण पुण्याची वाट लावून जाणार आहे. ते अतिशय कपटी आणि दुष्ट आहेत, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. अशोक खरात यांच दर्शन घेतल्यापासून त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
तसेच,चंद्रकांत पाटील यांचे ऑफिस पुणे पोलिसांनी तपासावं. निलेश घायवळचे फिंगर प्रिंट मिळतील, असा चिमटा रवींद्र धंगेकर यांनी काढला. विद्यार्थ्यांचं आंदोलन शांत झालं आहे. विद्यार्थी शांत आहेत. अशावेळी त्यांना चिघळवणे योग्य नाही. पक्ष असतो मात्र पक्षाच्या पुढे ही काही लोकांची आत्मियता असते, असंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाबाबतचं अजब विधान केलं आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांचे पायाचे ठसे दगडावर उमटले आहेत. त्या ठश्यांना आधारशी लिंक करून त्यांची ओळख पटवली जाणार आहे, असं दिल्ली पोलिसांचं अॅनालिसिस असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. या विधानावर आता सगळीकडून टिका होत आहे.












