
मुंबई, दि. 31 : भिवंडीमध्ये कोहिनुर अपार्टमेंट ही धोकादायक ठरलेली इमारत कोसळली.सदर घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 2 ते 3 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते.
इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री आठ वाजता इमारत झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत खाली करण्यात येत होती. परंतु तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू राहिल्याने व काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये असल्याने दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.








