बातम्या

यवतमाळमध्ये पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने बायकोसह 2 मुली वाहून गेल्या

यवतमाळ, दि. 31 : यवतमाळमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. दहेलीजवळ अडाण नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक इर्टिगा कार थेट पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. या भयानक दुर्घटनेत कार चालक झाडाचा आधार मिळाल्याने सुखरूप वाचले. परंतु दुर्दैवाने त्यांची पत्नी आणि दोन लहान मुली पाण्याच्या तीव्र प्रवाहात कारसह वाहून गेल्या आहेत.

आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश नामदेव खंडारे हे आपल्या कुटुंबासह इर्टिगा कारने लोणीच्या दिशेने परतत होते. मध्यरात्रीच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील मौजा दहेली येथील अडाण नदीच्या पुलावर आले असता, पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. अविनाश खंडारे यांचा पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला आणि त्यांनी कार पुलावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कार क्षणात महापुरात वाहून गेली.

या दुर्घटनेची बातमी मध्यरात्री सुमारे 3 वाजता मिळताच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts