
पिंपरी, दि. 2 : नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार, सुलभ आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट २०२६ पासून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला उपलब्ध होणार आहे.या ओपीडीमध्ये स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा (ईएनटी) तसेच सर्वसाधारण आजारांवरील तपासणी व उपचार अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा घराजवळच उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल, पिंपरी येथे महिलांच्या प्रसूती आणि त्यासंदर्भातील आवश्यक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी हॉस्पिटलचे डीन व प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ममता नाकाळे, डॉ. नीलिमा धारकर, डॉ. केतन जंगले, डॉ. इंद्रजीत घाडगे, डॉ. संपदा वैद्य, डॉ. आरती जाधव, व्यवस्थापक भूषण कुदळे, युवा नेते उमेश काटे, ह.भ.प. विलास अण्णा काटे, पोपटभाऊ जगताप, राजू टकले, संदीप जगताप, प्रतीक काटे, अतुल माने, उमेश इनामके, सनक्रिस्ट सोसायटीचे चेअरमन विशाल जाधव, सेक्रेटरी मिलिंद माने, खजिनदार मनीष दारक, डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक आणि सोसायटी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.