
मुंबई, दि. 4 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) निकृष्ट दर्जाचे कृत्रिम फ्लेवर्स वापरल्याचा आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा ठपका ठेवत ओल्ड मंक रमच्या तीन विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या कारवाईमुळे मद्य उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.
FSSAI च्या तपासात द लेजंड (The Legend), गोल्ड रिझर्व्ह (Gold Reserve) आणि XXX Matured Rum या प्रकारांच्या निर्मितीत नैसर्गिक परिपक्वता प्रक्रियेऐवजी बाहेरील कृत्रिम किंवा निसर्गसदृश (Nature-identical) फ्लेवर्स वापरण्यात आल्याचे आढळले. अन्न सुरक्षा नियमांनुसार अशा प्रकारचा वापर ग्राह्य नसल्याने संबंधित उत्पादनांवर कारवाई करण्यात आली.
याशिवाय, ओल्ड मंक XXX रमच्या एका प्रकारावर ‘7-Year-Old Blended’ असा दावा करण्यात आला होता. मात्र तपासात या मिश्रणात ५ टक्क्यांपेक्षा कमी जुने मद्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे FSSAI ने नमूद केले.ही कारवाई महाराष्ट्रातील खोपोली येथील मेसर्स मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर या उत्पादन युनिटमध्ये तयार होणाऱ्या संबंधित उत्पादनांवर करण्यात आली आहे.दरम्यान, FSSAI च्या या विशेष तपास मोहिमेत मॅकडोवेल्स नंबर 1 रम, रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी ब्लू आणि बॅगपायपर या लोकप्रिय ब्रँड्सच्या काही वेरियंट्सवरही नियमांचे उल्लंघन आढळल्याने बंदीची कारवाई करण्यात आली आहे.FSSAI ने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादनांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.