
दिल्ली, दि. 6 : बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार शाकिब अल हसन याच्या घरावर अज्ञात लोकांकडून पेट्रोल बॉम्बचा हल्ला करण्यात आला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत शाकिब अल हसन उपस्थित राहिला होता. त्यामुळे हा हल्ला करण्यात आला.
नवी दिल्लीतील ‘फॉरेन कॉरस्पॉन्डेंट्स क्लब’मध्ये बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शाकिब अल हसन देखील या पत्रकार परिषदेत ऑनलाईन सहभागी झाला होता. याचाच राग धरून अवामी लीगविरोधी घटकांनी शाकिबच्या घरावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
तसेच, मीडियाशी बोलताना शेख हसीना भावुक झाल्या. त्या म्हणाल्या आज मी केवळ एक माजी पंतप्रधान म्हणून नाही, तर राष्ट्रपिता बंगबंधू यांची मुलगी म्हणून बोलत आहे. लाखो लोकांनी ज्यासाठी बलिदान दिले तो हा बांगलादेश नाही. गेल्या काही वर्षांत काही संघटनांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर हिंसाचार आणि सत्तापालटासाठी केला,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच हसीना पुढे म्हणाल्या, चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतण्यासाठी कटिबद्ध आहेत. “माझे पुनरागमन सत्तेसाठी नाही, तर बांगलादेशला विकास, धर्मनिरपेक्षता आणि समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी आहे. मला तुरुगात धाडले तरी किंवा माझी हत्या केली तरी मी माझ्या जनतेसाठी नक्की परतणार,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.