
बेगुसराय, दि. 5 : बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराची तक्रार करणाऱ्या एका महिलेलाच गावातील पंचायतीने दोषी ठरवत भरसभेत गुडघ्यावर बसवून कान पकडायला लावले आणि स्वतःची थुंकी चाटण्याची अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात बलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पीडित महिलेच्या पतीचे कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्य असताना शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.घटनेनंतर आरोपी पळून जात असताना गावकऱ्यांनी त्याला पाहिल्याचे सांगितले जाते. मात्र, आरोपीवर कारवाई करण्याऐवजी गावातील पंचायतीने महिलेलाच दोषी ठरवत तिची भरसभेत मानहानी केली. तिला गुडघ्यावर बसवून कान पकडण्यास भाग पाडण्यात आले, तसेच स्वतःची थुंकी चाटण्यासारखी अमानुष शिक्षा देण्यात आल्याचा आरोप आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेतली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू असून व्हायरल व्हिडिओची सत्यताही पोलीस तपासत आहेत.या घटनेमुळे पंचायतीच्या बेकायदेशीर निर्णयांवर आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.