
मुंबई, दि. 25 : विद्यार्थ्याला “खिशात अमली पदार्थ ठेवून तुरुंगात टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर अखेर गृहखात्याने कारवाई केली आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली करण्यात आली असून, या घटनेमुळे पोलिसांच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती.
विद्यार्थ्याला धमकावतानाचा कथित संवाद व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांसह विविध विद्यार्थी संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहखात्याने संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई प्राथमिक स्वरूपाची असून, प्रकरणाची सखोल चौकशीही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना कायद्याचे संरक्षण मिळणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या धमक्या देणे अस्वीकार्य असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर आणखी कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.या घटनेनंतर पोलिसांच्या अधिकारांच्या वापराबाबत तसेच नागरिकांशी वागणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे.








