
मुंबई, दि. 30 : माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अत्यंत संवेदनशील पोस्ट लिहिली आहे.
“कॅप 278 आता निरोप घेत आहे. इतक्या वर्षांत तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी कायम ऋणी राहीन,” अशा शब्दांत त्याने चाहत्यांचे आभार मानले. व्हीडिओमध्ये बोलताना त्याचा घसा दाटून आला होता.
गळ्यात अडकलेला आवंढा, बोलताना अडखळणारे शब्द आणि डोळ्यात घळाघळा आलेले पाणी पाहून लाखो चाहतेही भावुक झाले. “तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही, नेहमी आपल्या कुटुंबातील एक भाग मानलं,” असं म्हणताना अजिंक्यला आपले अश्रू अनावर झाले होते.
रहाणेने आपल्या कारकिर्दीत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 144 कसोटी डावांमध्ये, रहाणेने 38.46 च्या सरासरीने आणि 49.50 च्या स्ट्राइक रेटने 5077 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने 26 अर्धशतके आणि 12 शतके झळकावली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 188 आहे. रहाणेने 6 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 4 कसोटी सामने जिंकले, तर 2 सामने अनिर्णित राहिले.







