
पुणे, दि. 2 : वेगाने बदलणाऱ्या या जगात तंत्रज्ञानाने अंतरं कमी केली, पण मनांमधली अंतरं वाढवली. मोबाईलच्या एका स्पर्शात जगभरातील माणसांशी संवाद साधता येतो; पण मन मोकळं करावंसं वाटलं, तर आजही आपल्याला एका खऱ्या मित्राचीच गरज भासते.म्हणूनच आज, मैत्री दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा…आपण खरंच मैत्री जपतो आहोत, की फक्त ओळखींची गर्दी वाढवतो आहोत?आज आपल्या मोबाईलमध्ये शेकडो नंबर आहेत. सोशल मीडियावर हजारो मित्र आहेत.
वाढदिवसाला शेकडो शुभेच्छा येतात, मैत्री दिनी स्टेटस आणि रील्सचा पूर येतो. पण जेव्हा आयुष्य कठीण वळणावर येतं, तेव्हा त्या हजारो नावांपैकी किती जण आपल्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे म्हणतात…पूर्वी मैत्रीला कोणत्याही निमित्ताची गरज नव्हती. संध्याकाळ झाली की मित्र आपोआप भेटायचे. एकाच ताटात जेवण, एकाच सायकलवर फिरणं, गावभरची भटकंती, सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभं राहणं… यालाच तर मैत्री म्हणायचे.आज वेळ आहे कामासाठी, मोबाईलसाठी, बैठकींसाठी आणि धावपळीसाठी… पण मित्रासाठी वेळ काढताना आपण अनेकदा उद्यावर ढकलतो.आणि हेच उद्या… नकळत वर्षांमध्ये बदलून जातं.
आपल्यापैकी कित्येकांचा एखादा जिवलग मित्र आजही गावात असेल. ज्याच्यासोबत आपण बालपण जगलो, स्वप्नं रंगवली, मनमोकळं हसलो, कधी भांडलो, तर कधी एकमेकांसाठी उभे राहिलो. पण आज त्याला भेटून कदाचित अनेक वर्षं झाली असतील.मग आजच वेळ काढा.गावातल्या त्या जुन्या मित्राला अचानक भेटून या. त्याच्या समोर जा… आणि कोणताही शब्द न बोलता त्याला मनापासून घट्ट मिठी मारा.विश्वास ठेवा…त्या एका मिठीत वर्षानुवर्षांचा दुरावा विरघळून जाईल.आणि जो मित्र तुमच्यापासून दूर राहतो, त्याला आत्ताच फोन करा. फक्त एवढंच विचारा…”कसा आहेस?”कदाचित त्या दोन शब्दांचीच तो अनेक दिवसांपासून वाट पाहत असेल.कारण पैसा पुन्हा कमावता येतो… यश पुन्हा मिळवता येतं… हरवलेल्या वस्तू पुन्हा विकत घेता येतात…पण काळाच्या ओघात हरवलेली माणसं आणि विरलेली मैत्री पुन्हा सहज मिळत नाही.या आभासी जगात हजारो मित्र मिळतील, हजारो लाईक्स मिळतील, हजारो प्रतिक्रिया मिळतील…पण खऱ्या मित्राच्या मिठीत मिळणारी ऊब, न बोलताही समजून घेणारा आधार आणि संकटात निःशब्दपणे सोबत उभं राहणारं प्रेम कोणत्याही स्क्रीनवर कधीच मिळणार नाही.
आज फक्त “Happy Friendship Day” असा संदेश पाठवून कर्तव्य संपवू नका.एखाद्या जुन्या मित्राला भेटा. दूर असलेल्या मित्राला फोन करा. त्याला एवढंच सांगा…”तू अजूनही माझ्या आयुष्यात तितकाच महत्त्वाचा आहेस.”एक दिवस असा येतो, जेव्हा मोबाईलमधले हजारो नंबर निरुपयोगी वाटतात… आणि आपण फक्त एका खऱ्या मित्राचा नंबर शोधत असतो.तो दिवस येण्याआधी मैत्री जपा.कारण वेळ निघून गेल्यावर हरवलेले क्षण परत मिळत नाहीत… आणि आयुष्याच्या प्रवासात हरवलेला खरा मित्रही सहज परत भेटत नाही.आजच मित्राला भेटा… कारण उद्या कदाचित वेळ असेल, पण तो क्षण नसेल.
संपादकज्योती आडेकर








