बातम्या

बारामतीत ‘दृश्यम’ स्टाईल थरार! पत्नीने पतीला गुंगीचे औषध देऊन क्रिकेट बॅटने मारहाण; जिवंत पुरण्याचा प्रयत्न

बारामती : कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला गुंगीचे औषध देऊन क्रिकेट बॅटने मारहाण केल्यानंतर घरातीलच बांधकामात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात उघडकीस आली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटाच्या धर्तीवर हा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली असून, कामगारांना संशय आल्याने आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्याने पतीची सुखरूप सुटका झाली.ही घटना बारामती शहरातील इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड परिसरात घडली. प्रवीण प्रकाश जगताप (वय ४१) हे एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८), बी.फार्म पदवीधर, हिला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलैच्या रात्री साडेअकराच्या सुमारास कौटुंबिक वादातून शर्मिलाने प्रवीण यांना कथितरित्या गुंगीचे औषध दिले. त्यानंतर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीण यांना क्रिकेट बॅटने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.यानंतर पतीला कायमचे संपवण्याच्या उद्देशाने घराच्या हॉललगतच्या गॅलरीत विटा आणि सिमेंटचा चौकोनी कट्टा तयार करण्यात आला. प्रवीण यांना या बांधकामात कोंडून त्यावर कडाप्पा फरशी बसवून ते बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, १ ऑगस्ट रोजी या कट्ट्यावर कडाप्पा फरशी बसवण्यासाठी काही कामगारांना बोलावण्यात आले होते. काम सुरू असताना कामगारांना कट्ट्याच्या आतून काहीतरी हालचाल जाणवली. संशय आल्याने त्यांनी आत पाहिले असता एक व्यक्ती जिवंत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कामगारांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवीण जगताप यांची सुखरूप सुटका केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला कुटुंबीय तक्रार देण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर प्रवीण यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी शर्मिला जगताप यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.या घटनेमागील नेमका कौटुंबिक वाद, कथित गुंगीचे औषध आणि जिवंत पुरण्याच्या कटाचा तपशील याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts