
पिंपरी : भाजी विक्रीची जागा आणि आदल्या दिवशी झालेल्या बाचाबाचीच्या वादातून एका २६ वर्षीय भाजी विक्रेत्यावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना पिंपरी येथे घडली. ही घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास गणेश स्वीट्ससमोर सार्वजनिक रस्त्यावर घडली. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.अकरम रफिक खान (वय २६, रा. मिलिंद नगर) हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. गणेश स्वीट्ससमोर भाजी विक्रीच्या जागेवरून त्यांचा शेजारील भाजी विक्रेता तथा रिक्षाचालकाशी वाद झाला होता. आदल्या दिवशीही दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.५ ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा याच कारणावरून वाद झाल्यानंतर संशयिताने अकरम खान यांच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे संशयित हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.भाजी विक्रीच्या जागेवरून सुरू झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात या घटनेची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












