
दिल्ली, दि. 1: जंतरमंतर विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका अल्पवयीन मुलीने प्रधानमंत्री मोदी यांच्यावर आक्षेपाहार्य टिका केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर या मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे.
व्हिडीओमध्ये ती मुलगी म्हणत आहे, “आंदोलनादरम्यान मी काही लोकांच्या अपप्रचाराला बळी पडले आणि मी पंतप्रधानांविरोधात अनेक वाईट गोष्टी बोलले.””मी फक्त 15 वर्षांची आहे, मी जे काही केले ते माफीयोग्य नाही. मी खूप वाईट गोष्टी बोलले आहे.” आपली ही पहिली आणि शेवटची चूक असल्याचे सांगत तिने या अपशब्दांबाबत संपूर्ण देशाची माफी मागितली आहे.
“मला खूप लाज वाटत आहे, मी स्वतःलाही पाहू शकत नाहीय. कृपया मला माफ करा.”पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी बुधवारी नोएडामधील पोलीस ठाण्यात या मुलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नोएडा पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ (Zero FIR) नोंदवून हे प्रकरण नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.












