मुंबई, दि. 7 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांना जवळपास ७ हजार कोटी रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जात आहे. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतची थकीत पीक कर्जाची रक्कम माफ केली जाणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची निश्चित रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा करून ते खाते निरंक करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, प्राप्तिकर भरणारे सुमारे ९४ हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे का आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे का, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.












